रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला दाखल करुन घेणे खासगी रुग्णालयाला बंधनकारक आहे. रुग्णाला परत पाठवणे, ताटकळत ठेवणे अशा तक्रारी आल्या तर रुग्णालयावर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड दमच आज जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खासगी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
रुग्ण गंभीर असल्यास व वेंटिलेटरची किंवा आयसीयु बेडची उपलब्धता नसल्यास त्याबाबत पूर्वकल्पना देऊन सामान्य बेडवर दाखल करुन घ्यावे व उपचार सुरू करुन तातडीने महापालिका नियंत्रण कक्षाला संपर्क साधावा, जेणेकरून रुग्णास इतर ठिकाणी आयसीयु बेडसच्या उपलब्धतेप्रमाणे स्थलांतरीत करता येईल किंवा कसे याबाबत तपासणी करुन कार्यवाही करावी. तसेच महापालिका नियंत्रण कक्षाकडून रेफर होणाऱ्या कोणत्याही रुग्णास ॲडमिशन नाकारण्यात येऊ नये. रुग्णांना दाखल करुन घेण्यास खाजगी रुग्णालयांनी टाळाटाळ करु नये, अशी सूचना जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केली. बैठकीस अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी रिता मैत्रवार, महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर, बजाज हॉस्पीटलचे डॉ.अलोक श्रीवास्तव, सिग्मा हॉस्पीटलचे धीरज तिवारी, धूत हॉस्पीटलचे डॉ.हिमांशू गुप्ता, एमजीएम हॉस्पीटलचे डॉ.प्रविण सूर्यवंशी, हेडगेवार हॉस्पीटलचे डॉ. अश्विनीकुमार तुपकरी, महापालिका नियंत्रण कक्षाचे डॉ.बशीर खान व वॉर रुम प्रमुख ॲलिस पोरे हे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले की, रुग्णवाहिकाद्वारे किंवा इतर वाहनाद्वारे आलेल्या रुग्णाला रुग्णालयाबाहेर वाहनातच ताटकळत न ठेवता, तातडीने कॅज्युअलिटी विभागात दाखल करावे, या करीता कॅज्युअलिटी विभागात ऑक्सीजनयुक्त किमान दोन खाटांची व्यवस्था ठेवावी व तिथेच तातडीने आवश्यकतेप्रमाणे ऑक्सीजन उपचार देण्याबाबत कार्यवाही करावी.
खाजगी रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागामध्ये कोविड संशयित व्यक्तींची तपासणी करण्याची अनुमती तथापि सदर व्यक्तीचा स्वॅब घेतल्यानंतर सदर व्यक्ती हा महापालिकेच्या विलगीकरण केंद्रातच दाखल केला जाईल याबाबत नियोजनपुर्वक कार्यवाही करण्याचे त्यांनी सूचित केले.
खाजगी रुग्णालयामध्ये अनावश्यक खाटा आरक्षित राहू नये या दृष्टीने कोविड बाधीत रुग्णांस सौम्य किंवा मध्यम लक्षणे असल्यास पहिल्या पाच दिवसांत उपचार करुन, नंतर सातत्याने लक्षणे नसल्याची खात्री करुन, पुढील उर्वरीत दिवस महापालिकेच्या कोविड केअर सेंटरला रेफर करावे, असे जिल्हाधकारी यांनी सांगितले.